Ladki Bahin KYC : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. योजनेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे, ज्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर पर्यंत आहे.
यापूर्वी, ई-केवायसीसाठी पती किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक देणे आवश्यक होते. मात्र, यामुळे अनेक विधवा, निराधार, आणि घटस्फोटित (एकल) महिलांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती, कारण त्यांना आधार क्रमांक उपलब्ध करणे शक्य नव्हते.
Ladki Bahin KYC एकल, विधवा महिलांना मोठा दिलासा!
या समस्येवर तोडगा काढत शासनाने आता अशा गरजू महिलांसाठी विशेष सुविधा सुरू केली आहे. ज्या लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पतीदेखील हयात नाहीत, तसेच ज्यांचा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांना आता आधार क्रमांकाऐवजी खालील कागदपत्रे जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे.
31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी लागणारी कागदपत्रे
- पती/वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र (दोघेही हयात नसल्यास दोघांचेही प्रमाणपत्र)
- घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश (घटस्फोटित महिलांसाठी)
लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, ही कागदपत्रे त्यांच्या संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी लागणार आहेत.
अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे का जमा करावी?
या विशेष प्रकरणांमध्ये कागदपत्रांची शहानिशा करण्यासाठी शासनाने ही पद्धत सुरू केली आहे:
- तपासणी: अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासणी करतील.
- शिफारस: त्यानंतर त्या पात्र लाभार्थी महिलांना पती अथवा वडिलांच्या ई-केवायसीपासून सूट देण्यास पात्र ठरवत असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे पाठवतील.
- लाभ कायम: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अंतिम शिफारस शासनाकडे करतील, त्यानंतर संबंधित महिलांना योजनेचा लाभ कायम ठेवला जाईल.
महत्त्वाची नोंद: शासनाने स्पष्ट केले आहे की, ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी किंवा ३१ डिसेंबरपूर्वी आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करावीत, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे.








